अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पारनेरच्या माजी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कामात अनियमितता असते, असे कारण देत त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली.
त्यानंतर तालुक्यात तहसीलदारचा तात्पुरता कार्यभार नायब तहसीलदारांकडे देण्यात आला. मात्र तरीही पारनेर तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरुच आहे. अवैध वाळू व्यवसाय विरुद्ध तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नाही.
प्रशासकीय यंत्रणेकडून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आवाज दाबला जात असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पारनेर तालुक्यात वाळू माफिया छुप्या पद्धतीने किंवा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळूतस्करी करत आहे. अवैध वाळू व्यवसायामुळे पारनेर तालुक्यातील अनेक रस्त खराब झाले आहेत.
तर वाळूच्या डंपरमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम