Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणामध्ये शिर्डी येथील एका २७ वर्षे वयाच्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. काल शनिवारी दुपारी २ वाजता मयताचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यातून वर काढला आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये शिर्डी येथील सहा तरुण पर्यटनासाठी आले होते. धरणाच्या सांडव्यापासून काही अंतरावर बरेच दूरवर निवांत ठिकाणी पाण्याच्या कडेला ते पर्यटनाचा आनंद घेत होते. या तरुणांना पोहण्याचा मोह न आवरल्याने सर्वजण पाण्यात उतरले.
या तरुणांबरोबरच सद्दाम शमीम शेख (वय २७) हासुद्धा पोहोण्यासाठी पाण्यात उतरला; मात्र त्याला व्यवस्थित पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती राजूर पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस मदतीसाठी धावले. तरुणाचा मृतदेह दुपारी राजूर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून वर काढला.
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. राजूर पोलीस स्टेशनला घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या अधिपत्याखाली दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे हे करत आहेत.
शिर्डी येथील हे तरुण भंडारदरा येथील पाण्यामध्ये पोहत असताना मस्ती करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भंडारदरा धरणाचे पर्यटन करताना तरुणांनी निसर्ग न्याहाळताना अतिउत्साहीपणा न दाखवता भंडारदरा धरणाचे शांततेत पर्यटन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
खबरदारी म्हणून येथील सांदन दरी पर्यटकांसाठी चार महिने बंद करण्यात आली आहे. आता भंडारदरा धरणाचे शांततेत पर्यटन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.