सुपारी किंग टोळ्यांची संगमनेरात दहशत, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांचे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. जमिनी खरेदी विक्री व्यवसायामध्ये प्रचंड पैसा मिळत असल्याने जमीन खरेदी विक्री करणार्‍या दलालांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 

अशातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्याबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या युवकांच्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. या टोळ्यांकडून संबंधित दलाल जमीन मालकावर दहशत निर्माण करून वाटेल त्या भावात जमिनी खरेदी विक्री करीत असून, या सुपारी किंग टोळ्यांकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये या टोळ्यांचा वापर केला जात आहे. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जमीन खरेदी विक्रीचे बेकायदेशीर व्यवहार होत आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे असे व्यवसाय सुरू आहेत.

जमीन मालकाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे काम काही दलाल करताना दिसत आहे. आता या दलालची मजल आणखी पुढे गेली आहे.

या दलालांनी आता गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या युवकांना हाताशी धरले आहे. त्यांच्या माध्यमातून संबंधित जमीन मालकावर दहशत दाखवून मनमानी किमतीने जमिनीची खरेदी विक्री व्यवहार केले जात आहे.

तसेच दहशत दाखवून जमिनीचे प्लॉट मोकळी करून देणे, नकार देणार्‍या जमीन मालकाला मारहाण करणे असे काम या टोळीत सहभागी असणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांकडून केले जात आहे.

या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांकडून शहरात होत असलेल्या गुन्ह्यांची तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे गेली होती.

यानंतर त्यांनी काही युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या युवकांना कोणत्या पोलिस अधिकार्‍याचा आशीर्वाद आहे याचा शोध उपविभागीय पोलिस अधिकारी घेऊन संबंधित युवकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये या युवकांनी धुडगुस घातलेला असतानाही शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांचे या युवकांच्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होत आहे.

या गुन्हेगार युवकांना संगमनेरात कोण आश्रय देतात याचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.