15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- 15 वर्षांपासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे.

आरोपी फुगारे याच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा दाखल आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव पोलीस ठाण्यातील दरोडा तयारी गुन्ह्यात पसार आरोपी संजय फुगारे याच्याविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपी फुगारे याला बोल्हेगाव उपनगरातील आंबेडकर चौक येथून ताब्यात घेतले.

दरम्यान आरोपीने शेवगाव व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करत शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.