मोठी बातमी : डॉ. पोखरणांचे निलंबन रद्दचा निर्णय कोणाचा? राजभवानाचे स्पष्टीकरण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगरचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन मागे घेण्याच्या विषयाला नवे वळण मिळाले. सरकारने काढलेल्या आदेशात राज्यपालांचा उल्लेख आहे.

तर हा निर्णय सरकारी पातळीवर झाला असून राज्यपालांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे.

राजभवनाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः निराधार व कल्पित आहे. डॉ. पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते.

त्यानंतर डॉ. पोखरणा यांनी २५ जानेवारी २०२२ रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींना अनुसरुन राज्यपालांकडे दाद मागितली होती.

राज्यपालांनी १६ मार्च २०२२ रोजी राजभवन येथे सुनावणी ठेवली होती. या सुनावणीसाठी अर्जदार डॉ. पोखरणा तसेच प्रतिवादी म्हणून शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना उपस्थित राहण्यासाठी कळवले होते.

या सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने डॉ. पोखरणा यांचे निलंबन १५ मार्च २०२२ रोजीच रद्द करून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय शिरुर या पदावर केली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव नीलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितले.

त्यामुळे राज्यपालांच्या आदेशावरुन डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe