अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. असं असलं तरी करोना धोका काही टळलेला नाही.
त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका.
नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.
“अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचं आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, करोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर करोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही.
त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल.”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोविड केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सूचना दिल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम