अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात काही दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे एका आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली होती.
करंजी शिवारातील भिमा गायकवाड,त्यांची पत्नी सत्यभामा आणि पौर्णिमा व साई ही दोन मुलं असे मोलमजुरी करणारे कुटुंब या झोपडीत राहात.
सकाळी मोलमजुरी करुन पोटाची उपजिवीका भरण्यासाठी बाहेर पडलेले हे कुटुंब सायंकाळी घरी परतलं तेव्हा पै-पै करुन मोठ्या मेहनतीने बांधलेले घरटे आगी मुळे होत्याचे नव्हते झाले होते.संसार उपयोगी साहित्य,भांडी यासह छोट्या डब्यात संसाराच्या भविष्यासाठी साठवून मेहनतीची रक्कम जळून गेली होती.
त्यांचे अंगावरील कपड्या व्यतिरिक्त काहीही शिल्लक नव्हते.जवळच राहत असलेल्या नातलगांनी तात्पुरता आश्रय दिला.ही बाब तहसिलदार योगेश चंद्रे यांना समजली त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.प्रत्यक्षस्थळी आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,कानिफनाथ आहेर यांनी भेट दिली.
हे पाहून या सर्वांचे मन हेलावून गेले. लोकसहभागातून सर्वांचे मदतीने झोपडी उभारणीचा निर्णय झाला.तहसिलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्तीगत मदत केली.प्रसिद्ध व्यापारी रिकबचंद शिंगी,शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख,सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके,
अतुल कोताडे, ॲड.महेश भिडे,सुनील भावसार, पत्रकार विजय कापसे,संदिप रहाणे,संजय शिंदे यांचे सह अनेकांचे हात मदतीला सरसावले.काही दिवसांतच ताडपत्रीने बंदीस्त अशा झोपडीची पुन्हा उभारणी झाली.
सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून घरगुती वापराचे साहित्य ठेवण्यासाठी मोठी लोखंडी पेटी, जेवणासाठी स्टीलचे ताट,ताटली,वाटी,पेला,कळशी अशी भांडी,कपडे,साडी,पांघरण्यासाठी चादर, किराणा सामान,लहान मुलांना खाऊ साहित्य,सौर उर्जेवर चालणारा विजेचा दिवा,
मुलांना वही शैक्षणिक साहित्य असे लोकसहभागातून भेट देण्यात आले. आगीच्या भक्ष्यस्थानी आदिवासी कुटुंबाचे झोपडीसह जळून पडलेले संसारोपयोगी साहित्य काही दिवसांतच माणुसकीच्या भावनेतून पुन्हा उभे राहिल्याने गायकवाड कुटुंबाचे डोळे आनंदाने पाणावले.
कोविडच्या संकटातही वेळ काढून तहसिलदार,समन्वयक आणि दानशूर नागरिक यांनी माणुसकीच्या भावनेतून केलेल्या कृतीबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम