कोरोनातील मृतांच्या वारसांना केंद्राने ४ लाखाची मदत द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोरोनात अनेक कुटुंबातील कर्ता, नातेवाईकांचा मुत्यू झाला. त्यांच्या वारसांना ४ लाख रुपये देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते.

बराच कालावधी होऊनही केंद्राने अद्याप पैसे दिले नाही. केंद्र सरकारने तातडीने ३ लाख तर राज्य सरकारने १ लाख रुपये द्यावे,

अशी मागणी काँग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राज्य घटनेने नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि अन्य आवश्यक सेवांसाठी मूलभूत अधिकार दिला.

कोरोनात अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले. या सर्व मृत व्यक्तींच्या वारसांना केंद्र सरकारने भरीव मदत करावी, अशी आग्रही मागणी खासदार राहुल गांधी यांनी केली होती.

मागणीवरुन केंद्राने मृतांच्या वारसांना ४ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. ७५ टक्के रक्कम (३ लाख) केंद्र सरकार तर २५ टक्के रक्कम (१ लाख) राज्य सरकार देईल, असे निर्देश होते.

मात्र बराच कालावधी उलटूनही मदत मिळाली नाही. आपत्ती निधीतून ५० हजार रुपये देण्यात येणारी मदत तुटपुंजी आहे. कोविड आपत्ती जाहीर करून केंद्र सरकारने अनेक कडक निर्बंध लादले.

नियमांचे उल्लंघन झाल्या प्रकरणी भरभक्कम दंड वसूल करण्यात आला. अशा वेळी मृत व्यक्तींच्या वारसांना तातडीने मदत देणे गरजेचे होते.