केंद्र सरकारने अपयश झाकण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. कोरोनात परप्रांतीय मजुरांना महाविकास आघाडी सरकार व काँग्रेसने केलेल्या मदतीचा सार्थ अभिमान आहे.

केंद्र सरकारने अपयश झाकण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, अशी टिका काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात केली. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री थोरात म्हणाले, केंद्र सरकारने कोणतीही तयारी न करता देशभर लॉकडाऊनची घोषणा केली.

यामुळे राज्यात असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांची परिस्थिती बिकट झाली. हातावर पोट असलेल्या या मजुरांना उपाशी मरण्याची वेळ आली.

ते घराच्या ओढीने आपल्या राज्यात परत जाऊ इच्छित होते, तेव्हा रेल्वे बंद होत्या. पायपीट करत मजूर निघाले होते. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले.

हे देशाने पाहिले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मजुरांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.

त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ५० हजार मजुरांना स्वखर्चाने सुखरूप त्यांच्या गावी पोहोचविले. महाविकास आघाडी सरकारने २०० कोटी रुपयांची तरतूद करत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची सन्मानजनक सोय केली.

या कामाची जगभर वाहवा झाली. परप्रांतीय मजुरांनी महाराष्ट्र सरकार व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले.

त्याच उत्तर प्रदेश, बिहार व काँग्रेसवर आरोप करून पंतप्रधान मोदी काय सिद्ध करू इच्छित आहेत? असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe