मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करणे, रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज ऑनलाईन बैठकीत घेतला.

या बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल,

एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी हे सहभागी झाले होते.

उत्तम समन्वय ठेवा :- या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लवकर कोरोनाचे निदान झाल्यास वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल.

त्यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांकडून रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच बाधित रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त रुग्णशय्यांच्या उपलब्धतेवर भर द्यावा.

त्याचप्रमाणे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा. या माध्यमातून रुग्णांना आवश्यक सुविधा देऊन हे संकट दूर सारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबालसिंह चहल म्हणाले, मुंबईमध्ये साधारणत: दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. असे असले तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणे नसलेले बाधित रुग्ण आहेत.

पुरेसे बेड उपलब्ध :- मुंबईत एकूण १५३ कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या २० हजार ४०० रुग्णशय्या आहेत. येत्या आठवड्यात ही संख्या २२ हजार होईल. १० फेब्रुवारी २०२१ पासून आजमितीपर्यंत १०५० आयसीयू रुग्णशय्या नव्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

दैनंदिन बाधित रुग्ण संख्या आता ८ ते १० हजारादरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील १० हजाराच्या घरात आहे.

यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज ३ हजार ९०० रुग्णशय्या रिक्त/उपलब्ध आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी निरनिराळ्या हॉटेल्स संलग्न करुन देण्यात येत आहेत.

रेमडेसिवीरबाबत प्रयत्न सुरु :- रेमडेसिवीर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही, याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या २ लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. अधिक पुरवठा लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्राणवायू पुरवठा : ६ समन्वय अधिकारी :- त्याचप्रमाणे मागील आठवड्यात रुग्णवाहिकांच्या ताफ्यामध्ये ३५० रुग्णवाहिका नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यासोबत प्राणवायू पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महानगरपालिकेकडून ६ समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नेमण्यात आले आहेत.

तर मुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करुन देऊ शकतील. मुंबईतील ६४ नर्सिंग होममध्ये प्राणवायूचा सुयोग्य व काटकसरीने उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यवाहीदेखील सुरु करण्यात आली आहे.

अवाजवी देयकांसाठी लेखा परीक्षकांची पथके :- तसेच खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी देयकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ३५ रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. देयक तयार होताच त्याचे स्वत:हून लेखापरीक्षण करण्यात येते.

चाचण्यांचे अहवाल लवकर मिळण्यासाठी नियोजन :- कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांच्या आत देण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱयांची प्रामुख्याने अँटीजेन टेस्ट करावी. त्यात बाधित आढळले तर त्यांचे विलगीकरण करुन, आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरुन बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील व आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी होईल, अशी सूचना पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केली.

ही सूचना तातडीने अंमलात आणण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात येतील, असेही श्री. चहल यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव श्री.कुंटे यांनी येत्या काळात मुंबई महानगरपालिकेला आवश्यक अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe