अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे गुरूवारी मध्यरात्री दोन वाजता चोरट्यांनी अमृत धोंडिबा पवार यांच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अमृत पवार व पत्नी हे गुरुवारी शेतातील कामे आटोपून सायंकाळी ९ वाजता जेवण करून घराबाहेर पडवीत झोपले होते.
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अंदाजे दोन ते चार चोरट्यांनी अतिशय निर्दयपणे पडवीत झोपलेल्या पवार यांच्या डोक्यात भला मोठा दगड घातला.
आवाज आला म्हणून त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यातील दोघांनी अमृत पवार यांच्या पत्नीच्याही डोक्यात जोरदार काठीचा फटका मारला व एकाने हातावर काठी मारली.
त्यात अमृत पवार यांच्या पत्नीचा हात मोडला. चोरट्यांनी लगेच त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे दागिने ओरबाडून काढली व चोर पसार झाले.
शेजारी राहणाऱ्यांना फोन करत कल्पना दिल्यावर सरपंच भोगाडे यांनी १०० नंबर डायल करत पोलिसांची मदत मागितली. पवार यांना प्राथमिक उपचारासाठी सुपा येथे हलविण्यात आले.
मार जास्त लागल्याने पवार यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात मार लागला असून त्यांच्या कपाळाची हाडे फॅक्चर झाली आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.