Maharashtra News:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्याचा आदेश काल रात्री आला आणि सर्वच कार्यकर्ते धास्तावले.
त्यावरून विविध चर्चा आणि शंकाही घेतल्या जाऊ लागल्या.मात्र त्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, हा निर्णय महाराष्ट्रात लागू नाही.
महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशासाठी निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस वगळून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सेल बरखास्त करण्यात आले. मात्र हा निर्णय महाराष्ट्रासाठी लागू नसेल, असे पटेल यांनी सांगितल्याने राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.