Ahmednagar News : साथीदारांसोबत मिळून कारचालकाने मालकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून, चाकूने वार करत लुटमार केली. या प्रकरणी शनिवारी (दि.८) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर बाळासाहेब गुंड पाटील (वय ३१, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद उर्फ संकेत रवींद्र इंगळे (वय २५), आनंद उर्फ भैया (पूर्ण नाव माहिती नाही. वय ३२), राचकर (पूर्ण नाव माहिती नाही. वय ३०, तिघे रा. विजयवाडी, अकलूज, जि. सोलापूर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री अकरा वाजताच्या सुमारास बाणेर येथे मुंबई-बेंगलोर महामार्गावर घडली. फिर्यादी यांच्या कारवर आरोपी ओंकार हा चालक म्हणून काम करत होता.
शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांचा मित्र त्यांच्या कारमधून जात असताना चालक ओंकार आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यावेळी फिर्यादी यांच्या मित्राने कारमधून बाहेर उडी मारली असता फिर्यादींनी कारचा हातातील ब्रेक ओढला.
त्यावेळी राचकर याने फिर्यादी यांच्या मित्राची दोन लाखांची सोन्याची साखळी ओढून घेतली. फिर्यादीवर चाकूने वार केले. तीन मोबाईल फोन, सोन्याची साखळी आणि कार असा एकूण २२ लाख ३० हजारांचा ऐवज तिघांनी जबरदस्तीने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.