मंदिरातला देव पुजायचाच आहे, उद्योग-कारखाना निर्माण करणारे खरे देव ! भास्करगिरी महाराजांच्या कानउघडणीने चर्चांना उधाण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्व. त्यांचे शब्द ऐकण्यासाठी श्रोते नेहमीच तत्पर असतात. आता सध्या त्यांच्या एका महत्वपूर्ण वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.

नेवाशातील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला.यावेळी त्यांनी भौतिक सुधारणांसाठी केलेली बौद्धिक कानउघडणी चर्चेचा विषय ठरली.

भास्करगिरी महाराजांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मंदिरातला देव पुजायचाच आहे. त्यापेक्षा समाजाकरता उद्योग-कारखाना निर्माण करणार्‍यांना खरे देव मानले पाहिजे. मठ-मंदिरे-धार्मिक क्षेत्र उभे करणे हे आंतरिक सुख आहे,

पण बाह्यसुख मिळवण्याकरिता समाजाला उपयोगी पडतील, अशा वास्तू आणि कारखाने निर्माण करणे गरजेचे आहे. सामूहिक शक्ती, नेत्यांचे धोरण आणि अध्यात्माची जोड या त्रिवेणी संगमातून भौतिक सुधारणा शक्य आहे” असे ते म्हणाले.

सर्वाना सोबत घेत सर्वांच्या प्रयत्नांची एकजूट करत व सर्वांचा विचार घेत कारखाना उभा करणे आणि तो टिकवणे ही तारेवरची कसरत असते. मारुतराव घुले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कारखाना, तसेच शिक्षण संस्था उभ्या केल्यात.

त्यामुळे हा परिसर सुजलाम-सुफलाम झाला आहे असे भास्करगिरी महाराज यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान त्यांनी केलेल्या बौद्धिक कानउघडणीने सर्वत्र चर्चा सुरु होती.

* कारखान्याच्या कामगारांसाठी खुशखबर

या कार्यक्रमातच कारखान्याच्या कामगारांना खुशखबर देण्यात आली. या कारखान्यातील कामगारांना 13 टक्के दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe