विरोधी आघाडीतील नेत्याच्या मुलाकडून हिंदू धर्म संपविण्याची भाषा

Ahmednagarlive24 office
Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी २८ पक्ष एकत्रित आले आहेत. या आघाडीत सहभागी असलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषा वापरली आहे. ही भाषा आघाडीतील इतरांना मान्य आहे काय ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

देशातील कितीही विरोधी पक्ष एकत्रित आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ. बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ‘संपर्क से समर्थन’ अभियान सुरु आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील या अभियानाचा संगमनेर येथून काल मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी आमदार बावनकुळे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर विविध योजनांचे लाभार्थी, व्यापारी, नागरीक आणि वेगवेगळ्या समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून, पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षांत केलेल्या योजनारुपी कामांच्या पत्रकाचे वितरण केले. यानंतर शहरातील मेन रोडवर आयोजित सभेत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आ. वैभवराव पिचड, लोकसभा समन्वयक राजेंद्र गोंदकर, महिला जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, भैय्या गंधे, भारतीय जनता युवा मोर्चाचे अॅड. श्रीराज डेरे, अमोल खताळ, निळवंडेच्या सरपंच पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून भाजपने शक्तीप्रदर्शन केले. पारंपारीक वाद्य, आदिवासी नृत्य, मल्लखांब खेळाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य रस्त्यावर उभारलेल्या विविध व्यासपीठावर जाऊन त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि माहिती पत्रकाचे वाटप त्यांनी जनतेत जावून केले.

आ. बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्यांना मतदानातून घडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात कितीही पक्ष येऊ द्या, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांनी महायुतीला ५१ टक्के मत मिळवायची आहेत. यासाठी पंतप्रधान मोदींच्या योजना संपर्क अभियानातून लोकापर्यंत घेऊन जा, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe