स्वराज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचे राज्य स्थापन करणे हीच छ्त्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती.त्यांच्याच विचारांचा जागर करून राज्यात महायुती सरकार काम करीत असून, योजनांच्या निर्णयात शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती दिनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्य स्थळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.प्रवरानगर येथे व्यापारी मित्र मंडळ आणि लोणी खुर्द आणि बुद्रुक येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून मंत्री विखे यांनी महाआरती केली.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनी विखे पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.लोणी येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य अखंड हिंदूस्थानच बलस्थान आहे.त्याग आणि संघर्षातून मिळालेले स्वराज्य टिकवून ठेवणे आपल्या सर्वाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
महराजांच्या इतिहासाची पारायण घराघरात झाली पाहीजे.कारण हा इतिहास आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा आहे.अनेक गड किल्ले महाराजांनी जिंकले.पण या गडांचा अभ्यास आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य सुध्दा खूप महत्वाचे असल्याचे विखे पाटील म्हणाले.
रयतेच्या राज्याची संकल्पना शिवाजी महाराजांनी कृतीत उतरवली.आज त्याच विचाराने राज्यातील महायुती सरकार लोकांसाठी काम करीत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.लोणी खुर्द येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले.
डॉ.विखे पाटील कारखान्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व संस्थामध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींनी शिवजयंती सोहळ्याचे उत्साहाने आयोजन केले होते.लोणी आणि पंचक्रोशीतील सर्व रस्ते भगव्या झेंड्यानी सजवले होते.युवक महीलांनी भगव्यामय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.