अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- सत्ता असतांना नागरिकांची कामे करता आली नाही व आता नागरिकांचे जे काही प्रश्न सुटत आहे ते प्रश्न आमच्यामुळेच सुटत असल्याचे भासवत श्रेय घेण्यासाठी काहींची धडपड सुरु आहे.
मात्र आपले प्रश्न कुणामुळे सुटले हे जनता जाणून आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना कुणीही श्रेय घेण्यासाठी पुढे आले तरी मला फरक पडणार नाही. नागरिकांचे प्रश्न सुटणे माझ्यासाठी महत्वाचे असून आपले प्रश्न कुणामुळे सुटले हे जनतेला माहित आहे असा अप्रत्यक्ष टोला माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता लगावला आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. १ व २ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी निवडून येताच केलेल्या पाठपुराव्यातून मार्गी लागला असून या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे.
मागील महिन्यात लौकी येथील जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी ६१,८७,०००/- रुपयांची भरपाई मिळाली आहे. व नुकतीच खोपडी येथील एकूण २२ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना २ कोटी १७ लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे.
त्या भरपाईचे धनादेश आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निवडून आल्यापासून या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या गावात जाऊन घोंगडी बैठका घेवून व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे पाठपुरावा कोणी केला आहे त्या लाभार्थी शेतकऱ्यांना माहित आहे.
विरोधकांकडे सत्ता किती वर्ष होती त्या कार्यकाळात जनतेचे प्रश्न का सुटले नाही. हे प्रश्न आत्ताच कसे सुटायला लागले याची देखील जाण जनतेला आहे.सत्ता असतांना काम करण्याची संधी होती परंतु त्यावेळी त्यांना जनेतेचे प्रश्न सोडविता आले नाही व आता कितीही बाता मारल्या तरी जनता तुम्हाला श्रेय देणार नाही.
त्यामुळे कोणतेही काम झाले की, आम्हीच केले अशी सतत टिमकी वाजवणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे असा उपरोधिक सल्ला माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, राजेंद्र खिलारी, शिवाजी शेळके, गणेश घाटे,
बाळासाहेब जाधव, बाळासाहेब वारकर, बाबासाहेब नवले, नांदूर मधमेश्वर कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता डी.पी. पाटील, शाखा अभियंता एस.पी. पवार, शाखा अधिकारी बी.आर. वारकर आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम