Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन आज ३० जुलै रोजी बरोबर एक महिना पूर्ण झाला.
मधल्या काळात या सरकारने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही. तर दुसरीकडे अपात्रतेची टागंती तलवारही कायम आहे.
शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली. गेल्या महिनाभरात या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांची चर्चा झाली. शिवाय काही निर्णयावरून वादही झाले.
तर दुसरीकडे एक ऑगस्टला शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा आणि शिंदे सरकारच्या भवितव्याचा सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. मात्र, त्यादिवशी सुनावणी होणार की आणखी पुढील तारीख मिळणार, याबद्दलही आता अनिश्चितता असल्याचे सांगण्यात येते.
मधल्या काळात शिंदे यांचा बहुतांश वेळ दिल्लीचे दौरे, सत्कार आणि भेटीगाठींमध्ये गेला आहे. आज सरकारला महिना होत असताना ते नाशिक व औरंगाबादच्या दौऱ्यावर असून तेथे त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.