अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- म्यूकरमायकोसिस आजाराच्या विरोधात मृत्यूशी झुंज देणाऱ्या शिर्डी येथील श्रद्धा कोरके या पाच महिन्याच्या चिमुकलीची गेल्या
अठरा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी अखेर संपली. या चिमुकलीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी अतोनात प्रयत्न केले.

परंतू, नियतीने त्यांना अपयश दिले.जीवनमृत्यूच्या लढाईत म्यूकरमायकोसिसने काल सकाळी चिमुकल्या श्रद्धाचा बळी घेतला.शिर्डी शहरात वास्तव्यास असलेल्या कोरके कुटुंबीयांची श्रद्धा नामक पाच महिन्याची चिमुकली.
कोरोना महामारीने साई मंदिर आणि शिर्डीतील हॉटेल व्यवसाय बंद असल्याने वसंत कोरके हे आपल्या परिवाराला घेऊन कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव या मूळ गावी गेले होते. दि. २७ मे रोजी त्यांच्या श्रद्धाला जुलाब आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली.
१ जून रोजी प्रवरा रुग्णालयात तपासणी करून पुन्हा घरी आणले होते. घरी आल्यानंतरही तिचा त्रास न थांबल्याने नातेवाइकांनी तिला नाशिक येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये भरती केले. उपचारादरम्यान तिच्या रक्तात ॲन्टीबॉडीज मिळून आल्याने तिला कोरोना होऊन गेल्याचे निदर्शनास आले.
डॉक्टरांनी त्यानुसार उपचार सुरू केले. मात्र, तिचा चेहरा, डोळा आणि शरीरास सुज येण्यास सुरुवात झाली. कोरके यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी उसनवारी करून उपचार सुरू केले होते. सर्व पैसे संपल्याने श्रद्धाला पुन्हा प्रवरा रुग्णालयात दाखल केले होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून येथील डॉक्टरांनी श्रद्धाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, दि. १५ जून रोजी सकाळी श्रद्धाची मृत्यूशी असणारी झुंज संपली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम