संघटनेने एसटी संप घेतला मागे; मात्र कर्मचाऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने तसेच कर्मचाऱ्यांच्या अन्य आर्थिक मुद्यांवर एसटी महामंडळाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.( ST strike)

मात्र, कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. त्यामुळे ही कोंडी फुटणार की कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान एसटी संघटनेने संप मागे घेतल्याने संघटनेतील कर्मचारी कामावर परततील.

त्यामुळे प्रदीर्घ काळ ठप्प असलेले राज्य परीवहन मंडळाची बस सेवा पुन्हा सुरु होईल अशी आशा आहे.तसेच कर्मचारी कामावर परतल्यास संप काळात त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात येईल असे अश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाबाहेर त्याबाबत आपल्याला काहीच चर्चा करता येणार नाही. विलीनीकरणाच्या मागणीसाठी नेमलेली त्रिसदस्य समिती जो निर्णय देईल तो एसटी महामंडळ व एसटी संघटना अशा दोन्ही बाजूंनी मान्य करण्याचे बैठकीत निश्चित झाले.

या बैठकीनंतर संप मागे घेतला जात आहे, अशी घोषणा गुजर यांनी केली. गुजर यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतरही कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत.

आझाद मैदानात उपस्थित एसटी कर्मचारी आणि लढा विलीनीकरणाचा (महाराष्ट्र राज्य)सदस्य सतीश मेटकरी यांनी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून संप मागे घेणार नसल्याचे सांगितले

वारसांना नोकरी देण्याचा प्रस्ताव करोनाकाळात आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेत चर्चा झाली. वारसांना नोकरी दिली जाईल. याबाबत एसटी महामंडळात प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे परब यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe