Indian Railways : दररोज देशात कितीतरी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यासाठी त्यांना तिकीट काढावे लागते. जर एखाद्या प्रवाशाकडे तिकीट नसेल तर त्यांच्याकडून दंड आकारला जातो. परंतु, भारतात अशी एक रेल्वे आहे ज्यामधून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागत नाही.
तसेच टीटीई तिकीट तपासत नसून लोक विनामूल्य प्रवास करत असतात. ही विशेष रेल्वे हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावत आहे. तुम्हीही त्याठिकाणी तिकीट न काढता मोफत प्रवास करू शकता. भाक्रा धरणाची माहिती लोकांना देण्यासाठी ही विशेष रेल्वे धावते.

कोणत्या मार्गावर धावते ही रेल्वे ?
ही रेल्वे पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चालवली जाते.ही रेल्वे भाक्रा व्यास व्यवस्थापन मंडळाद्वारे व्यवस्थापित केली जात असून ती भाक्रा ते नांगल दरम्यान धावते आणि 13 किलोमीटर अंतर कापते. या प्रवाशांकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही.
टीटीईही नसतो
भाक्रा-नांगल रेल्वे सतलज नदी आणि शिवालिक टेकड्यांमधून जाते. तसेच प्रवाशांकडून कोणतेही भाडे आकारत नसून लोक मोफत प्रवासाचा आनंद घेतात. इतकेच नाही तर या रेल्वेमध्ये तिकीट तपासण्यासाठी टीटीई नसतो.
यामागचे कारण काय?
जगप्रसिद्ध भाक्रा-नांगल धरण हे सर्वोच्च सरळ गुरुत्वाकर्षण धरण प्रसिद्ध आहे ते पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. ही विशेष रेल्वे फक्त या पर्यटकांसाठी चालवली जाते.
केव्हापासून झाली सुरुवात
ही रेल्वे 1948 मध्ये सुरू झाली असून सुरुवातीला ती वाफेच्या इंजिनने चालवली जात होती, परंतु,आता ती डिझेल इंजिनवर चालवली जाते. पूर्वी यात 10 डबे होते, आता ते कमी केले असून फक्त 3 बोगी वापरण्यात आल्या आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे डबे लाकडापासून बनवलेले आहेत. ही रेल्वे ज्या ट्रॅकवरून जाते त्या ट्रॅकवर तीन बोगदेही बांधले आहेत.
रेल्वे हेरिटेज म्हणून चालवली जाते
सन 2011 मध्ये भाक्रा व्यास व्यवस्थापन मंडळाने आर्थिक नुकसान लक्षात घेता मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर ती उत्पन्नाचा स्रोत न मानता वारसा म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.