अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आगामी तीन वर्षही महाविकास आघाडीचेच सरकार असणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून राज्याच्या सत्तेत कोणताही बदल होणार नाही.
असा मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. थोरात म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य भाजप अंतर्गत नैराश्य आलेल्या लोकांच्या संदर्भात आहे. भाजपाअंतर्गत एक मोठा वर्ग निराशेत आहे. त्यातील निराश झालेले ते काही शिवसेनेत, काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काही काँग्रेसमध्ये दाखल येऊ शकतात.

या अर्थाने मुख्यमंत्र्यांचे ‘भावी सहकारी’ असे वक्तव्य आहे. शुक्रवार रोजी अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर येथे दाखल होत नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असलेल्या पत्रकारांशी महसूलमंत्री थोरात यांनी संवाद साधला.
औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आजी-माजी व भावी सहकारी’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभरात विविध प्रतिक्रिया पुढे आल्या. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या समवेत महसूल मंत्री थोरात हे देखील उपस्थित होते.
औरंगाबादचा कार्यक्रम आटोपून थोरात नगर येथे दाखल झाले असता मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले.
याकडे लक्ष वेधले असता महसूल मंत्री थोरात म्हणाले, पंचनाम्याची प्रक्रिया काही ठिकाणी पार पडली असून काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. याचा एकत्रित अहवाल कॅबिनेट समोर येईल व त्यावर कॅबिनेटच्या बैठकीत मदतीच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल.
जीएसटी संदर्भात बोलताना मंत्री थोरात म्हणाले, केंद्र सरकारने जीएसटी करातील राज्यांचा वाटा वेळेवर देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.
महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर कोरोना सारख्या संकटाशी सरकार एकीकडे मुकाबला करीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होण्यासाठी प्रसंगी राज्य सरकार कर्ज काढून आपली जबाबदारी पार पाडत आहे. आशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्यांचा जीएसटीचा हिस्सा वेळेवर न देणे योग्य नाही.अशी टीका देखील त्यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम