अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील सर्वात मोठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असलेल्या वाळकी सोसायटीची दि.६ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द झाली आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे अकस्मात निधन झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
त्यामुळे आता वाळकी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पुन्हा पहिल्या पासून सुरु होणार आहे. नगर तालुक्यातील वाळकी सेवा सहकारी सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने दि. २७ जानेवारी पासून सुरू झाला होता. १३ जागांसाठी ४० उमेदवारांचे अर्ज राहिले होते.
दि .६ मार्चला मतदान व मतमोजणीचा कार्यक्रम होणार होती. दरम्यानच्या काळात दि.९ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरलेले रामदास पाटीलबा निमसे या उमेदवाराचा अकस्मात मृत्यू झाला.
त्यामुळे सोसायटीचे सभासद सुहास नारायण कासार यांनी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक स्थगित करून पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी असा अर्ज निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांना दिला होता.
या अर्जाची खातरजमा करून निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी सदर अर्ज मान्य करत वाळकी सेवा सोसायटीची दि. ६ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.
सहकार कायद्यात निवडणूक लढविणारा एखादा उमेदवार मृत्यु पावला असेल आणि त्याच्या मृत्युची बातमी निर्वाचन अधिकाऱ्यास मतदानास प्रारंभ होण्यापुर्वी मिळाली असेल आणि त्याबाबतच्या वस्तुस्थितीची खात्री पटल्यावर मतदानाबाबत प्रत्यादेश (निवडणूक रद्द बाबतचा आदेश) देईल.
त्याचप्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अथवा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यानां कळविल्यानंतर निवडणूकीच्या संदर्भातील कामकाज नविन निवडणूक असल्याप्रमाणे सर्वच बाबतीत नव्याने निवडणूक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात येईल अशी तरतुद आहे. त्यानुसार ही प्रक्रिया करण्याचे ते म्हणाले.