Alcohol Addiction : ‘अल्कोहोल अॅडिक्शन’ अर्थात अति मद्यपान ही अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमधील एक प्रमुख समस्या आहे. या देशांमध्ये मद्यपान करण्याला सामाजिक मान्यता आहे. पण आता त्यामुळेच या देशांमधील पुरुष तर सोडाच, महिलादेखील अधिकाधिक मद्यपान करून या घातक व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्या आहेत.
अमेरिकेबद्दल बोलायचे तर मागील दोन दशकांमध्ये अति मद्यपानामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण अर्थातच जास्त आहे. मात्र हळूहळू हे व्यसन महिलांमध्येही वेगाने पसरू लागले असून अतिमद्यपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महिलांची संख्या वर्षांगणिक वाढत चालली आहे.
अमेरिकेच्या आरोग्यविषयक सीडीसी या संस्थेच्या अहवालावरून ही गंभीर बाब समोर आली आहे.यासंदर्भात झालेल्या एका नव्या अध्ययनामधून तर असे स्पष्ट दिसून आले आहे की, अतिमद्यपानामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे.
तथापि अति मद्यपानामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आजही महिलांपेक्षा पुरुषांमध्येच जास्त आहे. पण तरीही यामध्ये महिलांचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या मानली जात आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेतील ‘जेएएमए नेटवर्क ओपन’ या वेबसाईटवर अमेरिकेतील महिलांच्या मद्यपानाच्या वाढत्या व्यसनाधिनतेबाबतचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
या अहवालामध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की, पुरुषांच्या तुलनेने महिलांवर अल्कोहोलचा प्रतिकूल परिणाम जास्त प्रमाणात होतो. जेव्हा महिला मद्याचा पहिला प्याला घेतात, तेव्हापासूनच त्यांच्या शरीरामध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. ही प्रक्रिया पुरुषांमध्ये तुलनेने फार मंद गतीने होते.