Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी धनगरवाडी शिवारातील डाळिंब पिकाच्या शेतात दोन चोरांना डाळिंब चोरताना रांगेहाथ पकडण्यात आले.याबाबत स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की वाकडी धनगरवाडी शिवारात रामभाऊ चांगदेव लोखंडे यांच्या गट नं १६ व १९ मधील शेतात डाळिंबाची बाग आहे.
या बागेतील झाडांना लागलेले डाळिंब विक्रीसाठी तयार आहेत. रोजच्या नित्यनियमाने रानात चक्कर मारत असताना डाळिंबाच्या बागेत कोणीतरी बारीक आवाजात बोलत असल्याचे रामभाऊ लोखंडे यांना ऐकू आले.
त्यांनी तात्काळ शेजारील लोकांना जमवून डाळिंब शेतात पाहणी केली. त्यांना दोन व्यक्ती रानात फळे तोडताना दिसले. या घटनेची माहिती लोखंडे यांनी वाकडीचे सरपंच डॉ. संपतराव शेळके यांना दिली असता श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोरसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन पवार, पोलीस कॉन्स्टेबल चांद पठाण, पोलीस नाईक संतोष बढे तात्काळ घटनास्थळी हजर झाले.
यावेळी पोलिसांनी लोखंडे यांच्या डाळिंब शेतातून दोन आरोपींकडून तीन प्लास्टिक कॅरेट डाळिंब व एक दुचाकी असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामभाऊ चांगदेव लोखंडे यांच्या फिर्यादिवरून श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपी महेश चंद्रभान काळे, जगन्नाथ राजाराम मोरे (रा. खोकर, ता. श्रीरामपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या वाकडी व चितळी परिसरात चांगल्या दर्जाचे डाळिंब फळ पिके काढणीस आले आहे. समाधानकारक बाजारभाव असल्यामुळे शेतकऱ्यांकडून तयार डाळिंब व्यापारी व बाजारात दिले जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.