Ahilyanagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे शनिवार दि. २२ रोजी पहाटे चोरट्यांनी बसस्थानका शेजारील किराणा दुकानासह अनेक घरांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. यात रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. चोरीच्या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर महामार्गालगत जेऊर बस स्थानका शेजारील अनेक घरांमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत. राजेंद्र पवार, रमेश मगर, नंदू मेहत्रे, संजय मेहत्रे, अनिल सुराणा, सुनील पवार, सुभाष पवार यांच्या घरी तसेच इमारत, कार्यालयामध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी पहाटेच्या वेळेस घडली. रमेश मगर यांच्या मालकीच्या जय मातादी किराणा स्टोअर्स दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला व किराणामालासह दुकानात उचकापाचक केली. तसेच दुकानाच्या वरच्या बाजूस राहत असलेल्या रमेश मगर यांच्या घरामध्ये देखील चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दुकानामधून किरकोळ स्वरूपाच्या साहित्याची चोरी झाली असल्याची माहिती मिळत आहे.
राजेंद्र पवार यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करून रोख रक्कम लंपास केली आहे तर बंगल्या मधील सर्व कपाटांची उचका पाचक करण्यात आली. बंगल्यामध्ये राहणाऱ्या सर्वांनाच बाहेरून कडी लावून कोंडण्यात आले होते. मुलगी जागी झाल्यानंतर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांनी छेडछाड केली आहे. नंदू मेहेत्रे व संजय मेहत्रे यांच्या घरून काही सोन्याचे व चांदीचे दागिन्यांची चोरी झाली आहे.
सुनील पवार यांच्या इमारतीच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. तेथे राहत असलेल्या दर्शन मुनोत यांच्या घरामध्ये प्रवेश करण्याचाही चोरट्यांकडून प्रयत्न करण्यात आला. सुभाष पवार यांच्या घराचे कुलूप तोडण्याचाही चोरट्यांकडून प्रयत्न झाला. चोरट्यांनी सर्वच ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाहेरून कडी लावून घेण्यात आल्याने चोरी झालेल्या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक चोर दिसत असून त्या आधारेच पोलिसांना घटनेचा तपास करावा लागणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी इमामपूर गावामध्ये देखील अशाच प्रकारे चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.