अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत पिछाडीवर गेले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कमी तरतूद करण्याचे काम सुरू आहे.
कृषी विभागाच्या राज्याच्या अनेक योजना बंद असून केंद्र सरकारच्या कृषी विषयक योजनासाठी राज्य सरकार मॅचिंग ग्रॅन्ट उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
ईडीच्याकारवाई वरून ते बोलत होते. ते म्हणाले की,राज्याचे कॅबिनेट मंत्री नबाब मलिक व त्यांच्या पक्षात नैतिकता असेल तर मालिकांनी तात्काळ मंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा.
ते राजीनामा देत नसतील तर राज्यपालांनी त्यांना मंत्रीपदावरून बरखास्त करावे. मुंबई बॉम्बस्फोटात अनेकांचे बळी गेले. ईडीच्या तपासातून मंत्री मालिकांचे संबंध थेट मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या संबंधितांशी असल्याचे पुढे येत आहे.
त्यामुळे मंत्री पदाचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.कोवीड काळात संवादाचा देखावा करीत लोकांसोबत असल्याचा आभास निर्माण केला गेला.
प्रत्यक्षात मात्र मूठभरांना सवलती देऊन राज्यातील सर्वसामान्य जनतेची नागवणूक करण्यात आली. कोरोना काळात छोटे व्यावसायिक, समाजातील दुर्बल घटक यांना मदत करून उभे करायला हवे होते.
त्याऐवजी मुंबईतील बिल्डर लॉबीसाठी मुद्रांक शुल्कमध्ये सवलत देण्यात आली. यात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. आपले झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करणे हे या निष्क्रिय सरकारचे काम आहे. मात्र, राज्यातील जनता दुधखुळी नाही.