NIlwande Dam : ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला !

Published on -

NIlwande Dam :  अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे पार पडली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली.

धरणाच्या सुरूवातीच्या २२ किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्वासात घेऊन गती देण्यात आली‌. यावर्षीच्या बजेट मध्ये गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे .त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही. धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.

अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात नगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली‌. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, अकोले व परिसरातील शेतकरी,

आदिवासी बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे‌. मधुकरराव पिचडांनी आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन मग धरण अशी त्याकाळात भूमिका मांडल्यामुळे विस्थापितांना न्याय मिळाला आहे‌.

आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करू या.पुढील दोन महिन्यात उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड यांनी आपले मनोगत केले. या कार्यक्रमास निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालव्यात पाणी सोडल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहवयास मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe