अहिल्यानगर- गुढीपाडव्यानिमित्त यंदा शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम पाहायला मिळणार आहे. मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रविवारी पहिल्यांदाच ग्रंथगुढीचा अनोखा उपक्रम होणार आहे.
त्याचबरोबर स्वस्वरूप संप्रदायातर्फे सकाळी स्वागत शोभायात्रा निघणार आहे. केडगावात कीर्तन महोत्सव होणार आहे, तर सायंकाळी सावेडीत रसिकोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा सणाचा उत्साह कायम आहे.

स्वस्वरूप संप्रदायातर्फे रविवारी सकाळी ७ वाजता स्वागत यात्रेची मिरवणूक निघणार आहे. दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भक्त या यात्रेत सहभागी होणार आहेत.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या सेवा समितीतर्फे ढोल-ताशांचा गजर आणि घोडेरथांसह ही मिरवणूक बुरुडगाव रोडवरून सुरू होईल. एलआयसी बिल्डिंग, माळीवाडा, बस स्टँड, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट मार्गे ही मिरवणूक मार्कंडेय मंगल कार्यालयात पोहोचून संपेल.
सावेडीत प्रोफेसर चौकातल्या हॉटेल दि कॅसलमध्ये हॉबी क्लबच्या वतीने ज्ञानेश शिंदे यांनी यंदा पहिल्यांदाच ग्रंथगुढी उभारायचं ठरवलं आहे.
“गुढी उभारु पुस्तकांची, संस्कृती जपू वाचनाची” या संकल्पनेतून वाचनाची आवड वाढावी, हा त्यांचा उद्देश आहे. या उपक्रमात पुस्तकांचं वाचन होईल, ग्रंथगुढीचं प्रदर्शन असेल आणि लोकांशी संवादही साधला जाणार आहे.
दरवर्षी रसिक ग्रुपच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आणि अहिल्यानगरच्या विकासात हातभार लावणाऱ्या मंडळींना “रसिक गौरव पुरस्कार” देऊन गौरवलं जातं.
रविवारी सायंकाळी ६ वाजता “रसिकोत्सव” कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जातील आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पाहायला मिळणार आहे. एकंदरीत, यंदाचा गुढीपाडवा शहरात खूपच खास आणि उत्साही होणार आहे.