कंटेनर-कार धडकेत अहिल्यानगर जिल्ह्यातील तिघांचा जागीच मृत्यू

Published on -

न्हावरा-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवार, २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. न्हावरा (ता. शिरूर, जि. पुणे) परिसरात मालवाहू कंटेनर (एन. एल. ०५ जी २३९६) आणि कार (एम. एच. १६ सी. व्ही. ४१७६) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये कोकणगाव (ता. श्रीगोंदा) येथील शेखर ऊर्फ गणेश महादेव नेर्लेकर (वय २५), तसेच न्हावरा येथील कैलास कृष्णाजी गायकवाड (वय ५०) आणि त्यांची मुलगी गौरी कैलास गायकवाड (वय १८) यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या कैलास गायकवाड यांच्या पत्नीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातातील सर्व प्रवासी एकमेकांचे नातेवाईक होते. ते शिक्रापूर येथे कामानिमित्त गेले असता परतीच्या प्रवासात हा अपघात घडला. कार न्हावरा शिवारात पोहोचली असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुढे बसलेले दोघे आणि मागे बसलेली गौरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील एकमेव जखमी महिला वाचली.

या घटनेनंतर न्हावरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी न्हावरा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe