नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी यावरुन एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. ‘प्रत्येक राज्य आपल्या समस्या घेऊन दिल्लीत येत असते. त्यासंबंधी टीका करणार नाही. पण जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले असतील तर महाराष्ट्र डोळे वरुन करुन त्यांच्याकडे पाहणार’, असे संजय राऊतांनी सांगितले आहे.
याआधी शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना कधीच सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आले नाहीत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नाही, तर भाजपचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी दिल्लीत आले होते, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“आम्ही ही संकटं पहिल्यांदा पाहिलेली नाहीत. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक असतील…पक्षाने मोठं करायचं, ताकद द्यायची आणि नंतर आपला गट घेऊन बाहेर पडायचं हे सगळीकडे होत आहे. एकाच पक्षात होत नाही. राजकारणात आता नितिमत्ता, निष्ठा, वैचारिक बंधनं राहिलेली नाहीत. फुटीरांना प्रोत्साहन देणारं नेतृत्व देशाच्या राजधानीत असेल तर असं घडणारच. श्यामप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी बोलता आणि दुसरीकडे बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्याचं पाप करता. आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत, पण उद्या हे पाप स्वस्थ बसू देणार नाही,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.
मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर ही त्यांची नेहमीची भेट आहे, कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हायकमांड येथे आहे त्यामुळे त्यांना दिल्लीत यावे लागले. मंत्रिमंडळ तयार करायचे आहे, मंत्र्यांची यादी करायची आहे. पण मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना कधी मंत्रिमंडळाची यादी किंवा सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे ऐकले नाही. त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या, अशी आठवण देखील यावेळी संजय राऊत यांनी करुन दिली आहे.