पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन आजपासून पावसाळी रजेवर !

Pragati
Published:

पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन पर्यटनाच्या गर्दीने ओसंडून वाहत असते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यंदा आठ दिवस आधीच नेरळ- माथेरान नेरळ मिनीट्रेनचा प्रवास थांबणार आहे. त्यानुसार शनिवार, ८ जूनपासून नेरळ-माथेरान नेरळ मिनीट्रेन पावसाळी सुट्टीवर जात असून,

१५ ऑक्टोबर रोजी ती पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन दरवर्षी १५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवली जाते. पर्वतीय रेल्वे मार्ग असल्याने पावसाळ्यात मिनीट्रेन चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येते.

मात्र, यावर्षी नेरळ-माथेरान- नेरळ मार्गावरील मिनी ट्रेन ८ जूनपासूनच पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. सध्या माथेरानमध्ये पर्यटन हंगाम असून, पर्यटकांची हजारोंची गर्दी माथेरान येथे आहे. असे असताना मध्य रेल्वे प्रशासनाने हवामान 406 खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे शुक्रवारची नेरळ-माथेरान नेरळ मार्गावर चालविली जाणारी प्रवासी वाहतूक या हंगामातील शेवटची ट्रेन ठरली आहे. गेल्यावर्षी ही मिनी ट्रेन १० जून रोजी स्थगित करण्यात आली होती, तर पावसाळी हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू होण्याची अपेक्षा असताना २४ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजे दोन महिने उशिरा सुरू झाली होती.

यावर्षी देखील आठ दिवस आधीच नेरळ-माथेरान नेरळ मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, मिनी ट्रेनची ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवासी पर्यटक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र, या काळात नेरळ-माथेरान मार्गावरील शटल सेवा कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहणार आहे. अमन लॉज ते माथेरान या दरम्यान मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू असते आणि त्या शटल सेवेच्या फेऱ्या पावसाळ्यात कायम ठेवण्यात येणार आहेत.

तसेच या मार्गावर प्रवासी वाहतूक बंद असली, तरी नेरळ येथून दररोज मालवाहू गाडी सकाळी साडे आठ वाजता माथेरान अमन लॉज येथे सोडली जाणार असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

शटल सेवेचे वेळापत्रक
माथेरान येथून अमन लॉजसाठी
सकाळी ०८.२०, ०९.१०, ११.३५; दुपारी २.००, ३.१५ आणि सायं. ०५.२०
शनिवार रविवार : सकाळी १०.०५ : दुपारी ०१.१०
अमन लॉज येथून माथेरानकरिता
सकाळी ८.४५, ९.३५ : दुपारी १२.००, ०२.४५, ०३.४० आणि सायं. ०५.४५
शनिवार रविवार सकाळी १०.३० : दुपारी ०१.३५

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe