अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतशिवारात झाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत.
ती आधी उतरवा आणि मग भोंगे उतरवायचे की नाही याचा निर्णय घ्या,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कडाडले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीवर टीका केली.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळायला हवा. खतांच्या किमती वाढल्या आहेत, डिझेलचा दर वाढला आहे, स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे, कोरोनामुळे खेड्यापाड्यातील मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहे. हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत. या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी सध्या महाराष्ट्रात भलत्याच मुद्द्यांवर चर्चा होत आहेत.
यामुळे महाराष्ट्रात जनतेच्या मनात मोठी अस्वस्थता आहे. आक्रोश आणि असंतोष आहे, म्हणून बळीराजाचा हुंकार बाहेर पडणं गरजेचं आहे.
आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, नंतर भोंगे उतरवा असं म्हणत राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.