सोमवार पासून कॉलेज मध्येच होणार लसीकरण !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने सरकाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घ्यावी.

येत्या सोमवारपासून (२५ ऑक्टोबर) १८ ते २५ हा वयोगटातील ४० लाख विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

आपण आताच योग्य काळजी घेतल्यास पुढील वर्षी मास्क घालण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना सामंत म्हणाले,

आता महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे संस्थांमधील शिक्षकांनी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घ्यावी.

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून चांगले उपक्रम राबवावेत. महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता देशात व जगात उंचवावी. महाविद्यालयीन शिक्षण घेताना महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा टिकवावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

दीड वर्षापासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना अाॅनलाइन पद्धतीने अध्यापन केले जात होते. अाॅनलाइन शिक्षण व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण घटल्याने सरकारने आता महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!