MPSC Clerk-Typist Selection : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक-टंकलेखक पदांसाठी उमेदवारांना पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयोगाने उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकरणासाठी पसंतीक्रम मागविले होते. मात्र, अनेक उमेदवारांनी अद्याप पसंतीक्रम सादर केलेला नसल्याचे लक्षात आल्याने आयोगाने शेवटची संधी दिली आहे.
पसंतीक्रम सादर करण्यास मुदत
आता उमेदवारांना 2 एप्रिल 2025 दुपारी 12:00 पासून 4 एप्रिल 2025 रात्री 11:59 पर्यंत पसंतीक्रम सादर करता येईल. जर यावेळीही उमेदवारांनी पसंतीक्रम सादर केला नाही, तर त्यांचा अंतिम निवड प्रक्रियेत विचार केला जाणार नाही आणि भरती प्रक्रियेतून वगळले जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत पसंतीक्रम सादर करावा, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पसंतीक्रम सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहील. कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास उमेदवारांनी आयोगाच्या टोल-फ्री क्रमांक 1800-1234-275 किंवा 7303821822 वर संपर्क साधावा. तसेच [email protected] या ई-मेल आयडीवरही सहाय्य उपलब्ध होईल.
MPSC परीक्षेचे स्वरूप कसे राहणार?
MPSC परीक्षेच्या स्वरूपात कोणताही बदल केला जाणार नसून, वर्णनात्मक स्वरूप कायम राहणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत जाहीर केले. सन 2022 मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर 2025 पासून तो लागू करण्याचे ठरले होते.
विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच वर्णनात्मक पद्धतीने घेतली जाईल. काही कोचिंग क्लास चालक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, मात्र हा बदल अत्यंत गरजेचा आहे.
पूर्वी 2023 मध्ये हा बदल लागू होणार होता, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर तो 2025 पासून लागू करण्याचा निर्णय झाला. वर्णनात्मक परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना केवळ MPSC साठी नव्हे, तर UPSC परीक्षेसाठीही अधिक चांगली तयारी करता येईल. त्यामुळे हा बदल मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.