अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कर्मचारीभविष्य निर्वाह निधीच्या (EPF) नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने नवीन आयकर नियमांना अधिसूचित केले आहेत. त्याअंतर्गत सध्याची भविष्य निर्वाह निधी खाती दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील.
जर एखाद्या व्यक्तीने ईपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले असेल, तर त्याला 2021-22 या आर्थिक वर्षापासून दोन स्वतंत्र पीएफ खाती ठेवावी लागतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
नवीन नियमांनुसार, करपात्र नसलेल्या पीएफ योगदानात यावर्षी मार्चचा बॅलन्स आणि व्यक्तीकडून २०२१-२२ आणि मागील वर्षांत केलेले योगदान असेल, जे करपात्र योगदान खात्यात समाविष्ट केलेले नाही आणि जे मर्यादेत आहेत. मर्यादेपेक्षा जास्त ठेव करपात्र योगदान खात्यात असेल आणि त्यावरील व्याजावर कर आकारला जाईल. CBDT च्या मते, हे नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जर तुमच्या पीएफ खात्यात २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल, तर तुम्हाला त्या अतिरिक्त रकमेवर मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागेल. ही माहिती तुम्हाला पुढील वर्षीच्या आयकर विवरणपत्र भरतानाही सांगावी लागेल.
जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात नियोक्त्याचे योगदान नसेल तर त्याच्यासाठी ही मर्यादा ५ लाख रुपये असेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे दरवर्षी अडीच लाख रुपयांची ही मर्यादा फक्त खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही.
जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर EPF आणि VPF मध्ये योगदानाची मर्यादा २.५ लाखांऐवजी ५ लाख रुपये आहे. याचा अर्थ जर सरकारी कर्मचाऱ्याच्या ईपीएफ आणि व्हीपीएफ खात्यात वार्षिक पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली गेली तर त्यांना त्या अतिरिक्त रकमेवर कर भरावा लागेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम