Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्यामुळे राज्य सरकारच्या हालचाली वाढल्याचे दिसत आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील सीमावादावरून आक्रमक होताना दिसत आहेत.
शरद पवार यांनी सीमावादावर भाष्य करताना म्हंटले आहे की, येत्या 48 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणे, त्यांना त्रास देणे थांबवण्यात आले नाही तर परिस्थिती चिघळेल.

महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल. मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावला जावे लागेल असा इशारा पवार यांनी दिला आहे.
त्यानंतर संजय राऊत यांनीही आक्रमक भूमिका मांडलेली दिसत आहे. ते म्हणाले, आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात कर्नाटकात जायला तयार आहोत. बेळगावच्या लढ्यासाठी दिग्गजांनी आयुष्य वेचलंय.
आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलंय? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारा. हे चालणार नाही. महाराष्ट्र पेटला तर त्यासाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील असेही राऊत म्हणाले आहेत.
तसेच पुढे बोलताना राऊतांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. त्यात आता कर्नाटक सरकार सोलापूर-सांगली या महाराष्ट्राच्या जागेवर दावा सांगत आहे.
मुंबईवर हल्ला सुरु आहे. महाराष्ट्राचे असे तुकडे करण्यासाठी ठाकरे सरकार घालवलं का? एवढी हतबल परिस्थिती महाराष्ट्राने कधी पाहिली नाही. शिंदे सरकार डरपोक आहे हतबल आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेसोबत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.