कीर्तनाला गेल्या अन लाखाचा ऐवज गमावून आल्या…!

Published on -

Ahmednagar News:गर्दीचा फायदा घेऊन खर्डा बसस्थानकातून एक लाख रुपयांचे सोन्याच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना जामखेड तालुक्यातील खर्डा बस स्थानक येथे घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, खर्डा हे गाव तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेले शहर असून, संत सीताराम गड, संत गीते बाबा गड, खर्डा येथील ऐतिहासिक किल्ला, स्वराज्य ध्वज व परिसरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरे मोठी नावारूपास आलेली आहेत.

ही सर्व स्थळे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे खर्डा बस स्थानकावर सतत गर्दी असते. त्यातच सीताराम गडावर अखंड हरिनाम सप्ताह निमित्त काल्याच्या कीर्तनाचा समारोप असल्यामुळे कीर्तन व महाप्रसाद घेण्यासाठी मराठवाड्यातील अनेक गावातील भाविक या ठिकाणी आले होते.

त्यामुळे कीर्तन संपल्यानंतर खर्डा एसटी स्टँडवर प्रचंड गर्दी झाली होती. त्या गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपयांचे दागिने चोरल्याची फिर्याद दोन महिलांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिली आहे.

यात मालन सोमीनाथ तागड यांच्या गळ्यातील दहा ग्रामचे मंगळसूत्र, दहा ग्रॅमचे डोरले. तर पूनम बालाजी पाटील यांचे १५ ग्रॅमचे गंठण, चार ग्रॅमचे कानातील झुमके, पाच ग्रॅमची अंगठी, दहा ग्रॅमची सोनसाखळी असा मुद्देमाल लंपास केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe