काय सांगता: दिवाळीत पुन्हा पावसाचे संकट…!

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी पुन्हा दिवाळीमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. पुर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर काही जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरवातही झाली आहे.

मात्र, पेरणी होताच पाऊस झाला तर पिक वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. ऐन दिवाळीत महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामातील कामे सुरळीत सुरु होती. अधिकचा पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये अद्यापही वाफसे नाहीत त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा रब्बी हंगामाला पोषक वातावरण असल्याने शेतकरी पुर्वमशागत आणि पेरणीच्या तयारीला लागला आहे. असे असतानाच हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा पावसाचे संकेत दिले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.

आगामी २,३ आणि ४ नोव्हेंबरला महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, श्रीलंकेपासून 250 किमी अंतरावर चक्रीवादळ तयार होत आहे. त्या वादळामुळे देशातील सहा राज्यांमध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी होण्याच्या आगोदरच नुकसानीचे सावट निर्माण झाले आहे.