Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? तरुणांना कपडे काढून झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेळी व कबुतर चोरी केल्याच्या संशयावरून तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना झाडाला उलट बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त होत असून काल शनिवारी हरेगाव येथे या घटनेच्या निषेधार्थं बंद पाळण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकमंत्र्यांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेतली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथील गलांडे वस्ती येथून काही दिवसांपूर्वी शेळी आणि काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून शुक्रवारी सकाळी चार तरुणांना त्यांच्या घरातून उचलून नेण्यात आले.

त्यानंतर त्यांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेत शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणि प्रणव खंडागळे हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी तरुणांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक केली जावी, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी युवराज नाना गलांडे, राजू बोरगे, पप्पु ऊर्फ राजेंद्र पारखे, मनोज बोडखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य यांनी केवळ चोरीचा संशय होता,

म्हणून या तरुणांना झाडाला लटकून निर्दयपणे मारहाण केली. या तरुणांची आई जेव्हा त्यांना वाचवण्यासाठी गेली, तेव्हा तिलादेखील धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार लहू कानडे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा विभागीय प्रमुख भिमा बागूल, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदिप मगर, भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,

पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांनी सायंकाळी श्रीरामपूरातील साखर कामगार रुग्णालयात जाऊन या तरुणांची भेट घेतली. आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe