Uddhav Thackeray : ज्यांच्या घराण्याचा आगेपिछा नाही, असे लोक आमच्या घराणेशाहीवर टीका करतात. अशा लोकांची आम्हाला पर्वा नाही. निदान आमच्या घराण्याचा इतिहास तरी आहे; पण जे लोक आमच्यावर टीका करतात, त्यांच्या घराण्याचा इतिहास काय? आमच्या गेल्या सहा-सात पिढ्या महाराष्ट्राच्या चरणी समर्पित होऊन जनसेवा करताहेत.
त्यामुळे समोर अख्खा भाजप जरी उभा राहिला, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकणार नाही, असे आव्हान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या वेळी ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे तसेच महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रबोधनकारांचे, बाळासाहेबांचे, उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व हे वेगळे नसून ते एकच आहे. ते बदलू शकत नाही. काळानुरूप जशा भूमिका प्रबोधनकारांनी घेतल्या, बाळासाहेबांनी घेतल्या तशाच मीसुद्धा घेत आहे.
आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही. आम्हाला केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय. आम्हाला अतिरेक्याला बडवणारा हिंदू हवाय. विश्वगुरूच्या सरकारच्या काळात हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतोय.
मग तुमचे हिंदुत्व गेले कुठे, असा सवाल या वेळी त्यांनी केला. भाजपने कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा दिला; पण बजरंग बलीने त्यांच्याच डोक्यात गदा हाणली. आता महाराष्ट्रात औरंगजेब समोर आणला जात आहे.
आजही औरंगजेब जिवंत आहे, पण तो महाराष्ट्रात नाही, तर शिवसेना, राष्ट्रवादी फोडणाऱ्या औरंगी वृत्तीच्या भाजपमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही औरंगजेबाचे राजकीय वारस आहात… भाजप राम मंदिर नाही, तर प्रत्येक राज्यात आयारामांचे मंदिर उभारत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
स्वराज्यावर अफझल खानाची स्वारी झाली, तेव्हा आमच्यात सामील व्हा, अन्यथा राखरांगोळी करू, असे फर्मान अफझल खानाने स्वराज्यातील सरदारांना पाठवले. सध्या ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणाही असेच फर्मान पाठवत आहेत, असा घणाघात ठाकरे यांनी केला.













