Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सध्या दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे.
शिंदे फडणवीस यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ यादीतून सत्तार यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. याची कुणकुण लागल्यामुळेच अब्दुल सत्तार धावत दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहेत.

नव्या सरकारचे मंत्रिमंडळ सध्या तयार होत आहे. शिंदे यांच्यासोबत आलेल्या सर्व माजी मंत्र्यांना पुन्हा पद मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र अलीकडे वेगळ्या घडामोडी घडत असून सत्तार यांची संधी हुकणार असल्याची चर्चा आहे.
सत्तार काँग्रेसमध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्यासोबतच त्यांनी काँग्रेस सोडली, मात्र त्यावेळी त्यांना भाजपमध्ये प्रवेश न देता शिवसेनेत पाठविण्यात आले होते.
आता पुन्हा भाजप सोबत सरकार बनले असताना सत्तार यांची मंत्रिपद हुकण्याची शक्यता निर्माण झाल्याचे बोलले जात असल्याने ते अस्वस्थ आहेत.उद्या मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद च्या दौऱ्यावर आहेत. ते सत्तार यांच्यासाठी सभा घेणार असून त्यांच्या घरी भेटही देणार आहेत, हेही विशेष.













