केंद्रासह राज्यात सत्ता असताना त्यांनी काय दिवे लावले ? नगराध्यक्ष वहाडणे यांची टिका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  राज्यात व केंद्रातही भाजपाची व स्वतः आमदार असतांना तुम्ही काय दिवे लावले? मी तरी  दिल्लीत जाऊन ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कंपनीला ५ नं. साठवण तलावासाठी खोदकाम सुरू करायला लावले.

पण पदाचा गैरवापर करून तेही त्यांनी बंद पाडले. आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते खोदकाम पुन्हा सुरू झाले. सध्या काँक्रिटचा ५ नं. साठवण तलावाच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.

पूर्वी २३ दिवसाआड पाणी देणारे तुम्हीच. गेल्या साडेचार वर्षात जनतेला हंडे-मडके घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ मी येऊ दिलेली नाही. असा सणसणीत टोला नगराध्यक्ष वहाडणे यांनी कोल्हे यांना लावला आहे.

कोपरगावसाठी आवर्तन मिळावे यासाठी १ महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत. मागील महिन्यात जलसंपदा विभागाला लेखी पत्र पाठवले. मात्र धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने धरणात पाण्याची आवक कमी आहे . तरीही लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.

मात्र कोल्हेंनी आवर्तनासाठी आंदोलनाचे नाटक करून जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका वहाडणे यांनी केली. ते म्हणाले कि मेनलाईनवर नळ कनेक्शन देणारे तुमचेच अनुयायी. त्यापैकी काहींचे पाणी कमी केलंय.

बाकीच्यांचेही पाणी कमी करण्याचे काम सुरू आहे. कोल्हे गटाचे काही नगरसेवक तर व्हॉल्व्हमनला दमबाजी करून जास्तवेळ पाणी द्यायला सांगतात.

त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो.पाच वर्षे पाणीपुरवठा समिती ताब्यात असूनही निष्क्रिय रहाणारा कोल्हे गट आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बरळत आहे, असेही नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe