मुंबई : मनावर दगड ठेवून भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पडसात उमटताना दिसत आहेत. भाजपने संबंधित व्हिडीओ समाजमाध्यमांवरुन डिलीट केला आहे. या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तिथे मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही. तरीही मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांनी थोडा काळ कोल्हापुरचे पाणी दाखवलं. जे त्यांच्या पोटात मळमळत होतं, ते ओठावर आलं. ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने दु:ख झाले हे प्रदेशाध्यक्षांचे मत नाही त्यावेळच्या घडामोडी आणि प्रसंगाबाबत कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला’’, अशी सारवासारव भाजपचे नेते अॅड. आमदार आशीष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे.