Ahmednagar News : पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू ठेवण्यासाठी ४० हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी कालवा निरीक्षक अंकुश सुभाष कडलग (पाटबंधारे, वडाळा उपविभाग अंतर्गत) याच्यासह दोघांना रंगेहाथ पकडले. अनिस सुलेमान शेख (रा. निमगाव खैरी, ता.श्रीरामपूर) व संजय भगवान कर्डे (रा. मोरगे वस्ती, ता.श्रीरामपूर) असे दोन खासगी इसमांची नावे आहेत. तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची माहिती लाचळुचपत प्रतिबंधकच्या नगर विभागाने दिली.
याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या सूनेच्या नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळाच्या मालकीची हरेगाव येथील गट नं. ३० मधील ३१९ एकर शेती १० वर्षांच्या कराराने कसण्यास घेतलेली आहे.
तक्रारदाराने सध्या ६० एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केलेली आहे. सदरील शेतीस पाटबंधारे विभागाच्या आवर्तनाद्वारे पाणी मिळते. त्यापोटी दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी भरावी लागते. तक्रारदाराला जानेवारी ते मार्च २०२३ या दरम्यान २६ हजार २८० रुपयांची पाणीपट्टी आली होती.
सदरची पाणीपट्टी तक्रारदाराने हरेगाव येथील कार्यालयात भरली होती. तक्रारदार यांचे ६० एकर ऊसाचे क्षेत्र असून, पैकी ३५ एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहिरी व बोअरद्वारे सिंचन केले जाते. उर्वरित २५ एकर क्षेत्रासाठी पाटबंधारे विभागाकडून पाणी घेतले जाते.
शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगून पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी पाटबंधारेच्या वडाळा उपविभागांतर्गत कालवा निरीक्षक अंकुश कडलग यांनी ८५ हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला
प्राप्त झाली.
त्यानुसार विभागाने ७ जून २०२३ रोजी लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान अंकुश कडलग यांनी अनिस शेख या खासगी इसमामार्फत तक्रारदाराकडे ८५ हजार रुपयांची मागणी करून ‘तडजोडीअंती ४० हजार रुपये लाचेची मागणी मान्य केली.
फोनवरील संभाषणाद्वारे या प्रकरणी दुजोरा देण्यात आला. २५ ऑगस्ट २०२३ रोजी कालवा निरीक्षक अंकुश कडलग याने तक्रारदाराकडून ४० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. ही रक्कम संजय कर्डे याच्याकडे हस्तांतरित केली. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.