पुणे : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यामध्ये (Pune) सभा घेत भाषणादरम्यान, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
यावर आज बारामतीत (Baramati) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, ज्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याऐवजी जातीय सलोखा निर्माण होईल त्यावर बोला, असे ते म्हणाणे.
तर विकासाच्या मुद्द्याला महत्त्व द्यायला हवे. याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, हे विचारू नका, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. तसेच त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या, विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे भावनात्मक राजकारण करतात. त्यांनी आंदोलने केली पण एकही आंदोलन पूर्ण न करता अर्धवट सोडली, अशी टीका अलिकडेच अजित पवार यांनी केली होती. टोलचे आंदोलन केले. एक दिवस त्यांचे कार्यकर्ते होते. नंतर ते दिसले नाहीत. त्यानंतर परप्रांतियांचे आंदोलन केले.
त्यामुळे राज्यात बांधकामे खोळंबली, आर्थिक नुकसान झाले. ते आंदोलन मागे पडले. याच्यासोबतच अशी अनेक आंदोलने अर्धवट सोडली. यातून केवळ नुकसानच झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. तसेच त्यांना स्वस्तातली प्रसिद्धी हवी असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
त्यावर राज ठाकरे यांनी आज प्रत्त्युत्तर देत आपली बाजू मांडली आहे. कोणतेही आंदोलन मागे सोडलेले नाही. टोलच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणचे टोल बंद झाले. मनसेमुळे राज्यातील भोंगे पहिल्यांदाच बंद किंवा अत्यंत कमी आवाजात होत असल्याचा दावा त्यांनी आजच्या सभेत केला आहे.