Banking Loan : तुम्हालाही नव्याने कर्ज काढायचं? मग आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरेतर, आजच्या काळात विविध गरजासाठी कर्ज काढले जाते. वाहन, घर किंवा वैयक्तिक गरजांसाठी कर्ज घेणे ही एक सामान्य बाब बनली आहे. बँका कर्ज देताना कर्जदाराचा आर्थिक इतिहास, उत्पन्न आणि परतफेडीची क्षमता याचा नीट विचार सुद्धा करतात.
पण, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्जाची जबाबदारी कोणावर येते, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. आता आपण याच प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून जाणून घेऊयात. बँकांच्या नियमानुसार, कर्जदाराचा मृत्यू झाल्यास सर्वप्रथम बँक सहअर्जदाराशी संपर्क साधते. गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्जामध्ये सहअर्जदाराचे नाव असते आणि तो परतफेडीस जबाबदार धरला जातो. जर सहअर्जदार कर्ज चुकवू शकला नाही, तर बँक पुढे हमीदाराशी संपर्क करते. हमीदारही नकार दिल्यास बँक मयताच्या कायदेशीर वारसांशी संपर्क साधते.

या वारसांमध्ये पत्नी, मुलं किंवा पालकांचा समावेश होतो. बँक त्यांना कर्जफेडीबाबत नोटीस आणि स्मरणपत्रे पाठवते. जर प्रतिसाद मिळाला नाही, तर बँक कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबते. कर्जफेडीला कोणीही तयार नसेल, तर बँक मयताची संपत्ती जप्त करू शकते. गृहकर्जाच्या बाबतीत ती घर किंवा फ्लॅट लिलावात विकते. वाहनकर्ज असल्यास वाहन जप्त करून विक्री केली जाते.
वैयक्तिक कर्जाच्या प्रकरणातही मयताची संपत्ती विकून बँक कर्ज वसूल करते. पण, जर कर्जावर विमा (Loan Insurance) घेतलेले असेल, तर मृत्यूनंतर संपूर्ण कर्ज विमा कंपनी चुकवते. त्यामुळे कुटुंबावर कोणताही आर्थिक बोजा येत नाही. बँक वारसांवर जबरदस्ती करू शकते का ? नियमांनुसार, जर वारसांनी संपत्तीवर अधिकार सांगितला असेल, तर त्यांना कर्जाची जबाबदारी घ्यावी लागते. पण जर त्यांनी कोणताही मालमत्तेचा दावा केला नसेल, तर बँक त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही. त्यामुळे कर्ज घेतेवेळी कर्ज विमा घेणे ही सर्वात सुरक्षित बाब ठरते.











