Maharashtra News:उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या मालकीवरून सुरु असलेल्या वादाचा फैसला आता लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केला जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते.
यावर शिवसेना नेमकी कुणाची याचा सोक्षमोक्ष लावला जाणार आहे. यामध्ये शिवसेनेची घटना, निवडणूक आयोगाचे नियम आणि दोन्ही बाजूंनी केलेला युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून आयोगाकडून निर्णय दिला जाणे अपेक्षित आहे. यावर दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून आहे.