आठवलेंचे शिर्डीत पुन्हा स्वागत करणार का? विखे पाटील म्हणाले…

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अर्थात यासाठी त्यांची संपूर्ण मदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आहे.

त्यामुळे आठवले यांच्या या इच्छेसंबंधी काय वाटते? त्यांचे स्वागत करणार का? या प्रश्नाला खासदार डॉ. विखे पाटील यांनी सावध उत्तर दिले आहे.

डॉ. विखे पाटील म्हणाले, भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक समिती उमेदवारासंबंधी निर्णय घेणार आहे.

पक्षाकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला निव़डून आणण्याची आमची जबाबदारी राहील.’ असे विखे पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वी नगरला आलेल्या आठवले यांनी ही इच्छा बोलून दाखविली होती.

मुळात पूर्वी जेव्हा त्यांचा पराभव झाला होता, त्यावेळी विखे पाटील यांनीच सूत्रे हलवून त्यांचा पराभव घडवून आणल्याची चर्चा अनेक वर्षे सुरू होती. स्वत: आठवले यांनीही हे आरोप केले होते.

आता जेव्हा आठवले आणि विखे पाटील दोघेही भाजपसोबत आहेत, तेव्हा आठवले यांनी आपली भाषा बदलल्याचे दिसून येते.

दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये बोलताना आठवले म्हणाले होते, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी २०२४ मध्ये लढण्यात इच्छुक आहे.

यावेळेस लढणार आहे व पडणार नाही. २००९ मध्ये नगरची जागा राष्ट्रवादीने बाळासाहेब विखेंना दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी शिर्डीत फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मला पराभव पत्करावा लागला.

नंतर राज्यसभेचे सदस्य व्हावे लागले. परंतु आता मी २०२४ च्या निवडणुकीत शिर्डीमधूनच उभा राहणार असून येथून चांगल्या मतांनी निवडून येईल,

असा मला विश्वास वाटतो, असेही आठवले म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विखे पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe