मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे नव्या पक्षाची घोषणा करणार? शरद पवार म्हणतात..

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा अजून कायम असून छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरत राज्यभर मेळावे घेतले तसेच उपोषणाला देखील बसले होते.

मात्र अजून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष (New party) काढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

कारण संभाजीराजे समर्थकाकडून चलो पुणे चा नारा देण्यात आला आहे. आता “महाराष्ट्राच्या भल्यासाठी नवी दिशा, नवा विचार, नवा पर्याय” आशा टॅगलाईन खाली पुण्यातील १२ तारखेच्या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन केले जातेय.

तसेच उद्या छत्रपती संभाजीराजे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार अशीही माहिती समोर आली असून राज्याचा दौरा करून राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फक्त राजकीय पक्षच नाही तर सामाजिक संघटनांकडून संभाजीराजेंना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आणि याबाबत १२ तारखेला पत्रकार परिषद (Press conference) घेऊन संभाजीराजे भूमिका मांडणार अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांच्याबाबत राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. मी देखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे.

ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे.

पण त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe